त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही.
ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला.
जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.
लोकांना संकटाची चाहूल लागून ते घाबरून जातील. काही लोक सैरावैरा पळतील. पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील. त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील. पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,” आकाश फाटेल आणि प्रलय होईल. पृथ्वीचा पाय कापू लागेल.
पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.