इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वत:साठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल.
इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.
इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले. पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन. पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.
इस्राएलींना बळी देणे आवडते. ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात. परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही. त्याला त्यांची पापे स्मरतात. म्हणून तो त्यांना शिक्षा करील. कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
इस्राएलने राजवाडे बांधले. पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे. पण मी यहूदातील गावाला आग लावीन आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”