इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत.
“लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ व ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे.
एफ्राईमने स्वत:चा आजार व यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे. यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे. मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन. मी त्यांचे हरण करीन. आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.