ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”
इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का? कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली. इस्राएली तलवारीला बळी पडतील. त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल. त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”