अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुन सांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?
मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दाने तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत?
देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.
पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.”
ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.”
ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे.
अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुइया संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे.
तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले.
नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल.
पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.
हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.