“आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली. त्याची आंबट चव मात्र मुलांनी घेतली. ही म्हण तुम्ही नेहमी म्हणता. ते का? तुम्ही पाप करु शकता, भविष्यकाळात कोणालातरी त्याची शिक्षा मिळेल, असे तुम्हांला वाटते.
तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांना दाखवलेले नैवेद्य खात नाही, इस्राएलमधील अमंगल मूर्तीची तो प्रार्थना करीत नाही. तो शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करीत नाही, आपल्या स्वत:च्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी तिच्याजवळ जात नाही.
तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो.
तो मुलगा पुढील वाईट गोष्टी करत असेल. तो डोंगरावर जाऊन खोट्या देवांना दाखविलेला नैवेद्य खात असेल, तो दुष्ट मुलगा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर, व्यभिचाराचे पाप करीत असेल.
तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल.
एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत : जबाबदार असेल.
“आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल व त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो.
तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांचा प्रसाद खात नाही. तो इस्राएलमधील घाणेरड्या मूर्तीची कधी प्रार्थना करीत नाही. शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचाराचे पाप करीत नाही.
तो गरिबांना मदत करतो गरजूला पैसे उसने दिल्यास, त्यावर व्याज घेत नाही. तो माझे नियम पाळतो त्याचप्रमाणे वागतो. त्याच्या वडिलांच्या पापांसाठी, चांगल्या मुलाला मृत्युदंड मिळणार नाही. तो मुलगा जिवंत राहील.
वडील कदाचित लोकांना दुखवीत असतील आणि चोरी करीत असतील. ते त्यांच्या माणसांकरिता काहीच भल्या गोष्टी करीत नसतील ते त्यांच्या पापांनी मरतील. पण वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही.
“तुम्ही कदाचित् विचाराल ‘वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा का होणार नाही?’ कारण मुलगा प्रामाणिक होता व त्याने सत्कृत्ये केली. त्याने माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या. म्हणून तो जगेल.
पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.
“पण, वाईट माणूस, सुधारला, तर तो मरणार नाही. तो जगेल. त्याने पूर्वी केलेल्या वाईट गोष्टी तो करण्याचे सोडून देईल व माझे नियम काळजीपूर्वक पाळील तो सज्जन व प्रामाणिक होईल.
“कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”
का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, “म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.
तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी (मूर्ती) फेकून द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता. तुमचे ह्दयपरिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या. इस्राएलच्या लोकांनो, स्वत:च स्वत:चा मृत्यू का ओढवून घेता?