नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेत पाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.” तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला.
मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला.
मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.