इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व जनावरांना फोड व गळवे येऊ लागली.
परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सकाळी उठ व फारोकडे जा; आणि त्याला सांग की इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!
तू हे केले नाहीस तर मग मी माझे सारे सामर्थ्य तुझ्याविरुद्ध तुझे सेवक व तुझ्या लोकांच्याविरुद्ध वापरीन. तेव्हा मग तुला माहीत होईल की या जगात माझ्यासारखा दुसरा देव नाही.
म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
तेव्हा आता तू तुझी गुरेढोरे सुरक्षित जागी ठेवलीच पाहिजेस; शेतात तुझ्या मालकीचे काही असल्यास ते सुरक्षित जागी ठेवलेच पाहिजेस, कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यांवर गारांचा भडीमार पडेल.”‘
परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुराढोरावर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
तेव्हा मोशेन आपली काठी आकाशकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.