त्याने तिच्या प्रत्येक कोपऱ्यास एक याप्रमाणे चार शिंगे बनविली व ती कोपऱ्यांना अशी जोडली की वेदी व शिंगे एकाच अखंड तुकड्यांची बनविलेली दिसू लागली; त्याने ती पितळेने मढविली.
अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती व तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
अंगणाच्या फाटकाचा पडदा निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर नक्षी विणलेली होती; तो दहा वार लांब व अडीच वार उंच होता; ही उंची अंगणाच्या सभोवतीच्या कनातीच्या उंचीइतकी होती.
तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.
मोशेने लेवी लोकांना, पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा मंडप तयार करण्याकरता लागलेल्या सर्व सामानाची यादी करण्यास सांगितले होते; अहरोनाचा मुलगा इथामर त्याच्यावर ती जबाबदारी प्रमुख म्हणून सोपविलेली होती.
तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निव्व्या, व जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढण्याचा कामात तरबेज होता.
वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली.
त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या खुर्च्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या खुर्च्या, तसेच पवित्र निवास मंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.