मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले;
तेव्हा तो देवाच्या पर्वताजवळ म्हणजे होरेब किंवा सीनाय पर्वताजवळ, जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेला भेटावयास गेला इथ्रोने मोशेची बायको सिप्पोरा हिलाही बरोबर आणले; (सिप्पोरा मोशे बरोबर नव्हती कारण त्याने तिला माहेरी पाठवले होते.)
दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले.”
तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा व त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.
तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले.
परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी जे जे केले ते सर्व मोशेने इथ्रोस सांगितले. मिसर देशाचा राजा फारो व त्याचे लोक ह्यांचे परमेश्वराने काय केले तसेच मिसरहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला आणि परमेश्वराने त्या सर्वांतून दरवेळी इस्राएल लोकांना कसे वाचवले ती सर्व हकीकत मोशेने इथ्रोस सांगितली.
परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
मग इथ्रोने देवाला यज्ञ व अर्पणे केली. नंतर अहरोन व इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.
मोशेला इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करताना इथ्रोने पाहिले तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू असे का करीत आहेस? तू एकटाच न्यायनिवाडा का करीत आहेस? आणि लोक न्यायनिवाड्यासाठी दिवसभर तुझ्याकडे का येतात?”
लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना दवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”
तू लोकांना देवाचे नियम व विधी या संबंधी शिक्षण दे; आणि ते त्यांनी मोडू नयेत अशी ताकीद त्यांना दे; लोकांनी आपल्या जीवनात योग्य मार्गाने चालावे व त्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्यांना तू समजावून सांग.
तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.