ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा.
ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.
परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.
“अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.
तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
बेखमीर भाकरीच्या सणाची तुम्ही आठवण ठेवावी कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना गटगटांनी मिसरदेशातून बाहेर काढून नेले म्हणून तुमच्या सर्व वंशाजांनी हा दिवस पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.
तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही.
तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले’ त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.
मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले.
तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही व तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
मिसरच्या लोकांनी सुद्धा इस्राएल लोकांना घाईकरून लवकर निघून जाण्यास सांगितले; कारण ते म्हणाले, “तुम्ही जर येथून निघून जाणार नाही तर आम्ही सर्वजण मरून जाऊ!”
इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले.
मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना त्या त्या वस्तू दयाव्यात म्हणून त्यांच्या मनात परमेश्वराने इस्राएल लोकांविषयी दया निर्माण केली आणि म्हणून मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना मौल्यवान वस्तू दिल्या.
त्यांच्या सोबत पुष्कळ शेरडेमेंढरे व गुरेढोरे होती. अनेक प्रकारचे लोक त्यांच्याबरोबर प्रवास करीत होते, ते इस्राएली नव्हते परंतु त्यांनी त्याच्या बरोबर मिसर देश सोडला.
इस्राएल लोकांस आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. तसेच आपल्याबरोबर प्रवासाकरिता खावयास काही विशेष जेवण करता आले नाही; म्हणून त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या.
म्हणून ज्या रात्री त्यांनी मिसरदेश सोडला त्या रात्री परमेश्वराने त्यांच्या करिता काय केले त्याविषयी त्या विशेष रात्रीची त्यांना आठवण राहील. सर्व इस्राएल लोकांनी त्या रात्रीची आठवण अगदी पिढ्यान् पिढ्या ठेवावी.
इस्राएली नसलेला कोणी एक जण तुम्हांबरोबर राहात असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंताकरून घेतली नाही तर त्याला वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होता येणार नाही.