खूप लोकांना वाईट वागणूक दिली गेल्याचे मी पुन्हा पाहिले. आणि या दु:खी लोकांचे सांत्वन करायला कुणीही नाही. हे ही मी पाहिले. दुष्ट लोकांकडेच सर्व सत्ता असते. हे मी पाहिले. आणि ते ज्या लोकांना दु:ख देतात त्यांचे सांत्वन करायलाही कुणी नसते, हे ही मी पाहिले.
नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर आधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.