“आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि वाढून एक महान राष्ट्र बनाल. तुमच्या राष्ट्राची भरभराट होईल. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेला प्रदेश तुम्ही ताब्यात घ्याल.
तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले.
तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे.
तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले.
तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.
“तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच ही ताकीद मी आत्ताच तुम्हाला देऊन ठेवतो.