परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.
“परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल.
आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही.
आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
“पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.
“तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.
परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.
“परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील.
लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.
“तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
“तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.
ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.
“तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.
परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.
तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.
“ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
“तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
“तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.
खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
“तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
“तुमची भरभराट करायला आणि तुमची संरव्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसानळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल.
परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे! आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.