“तुम्ही शत्रूवर चाल करुन जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमचा पाठीराखा आहे.
“मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला उद्धेशून असे सांगावे, ‘नवीनघर बांधून अजून गृह प्रवेश केला नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात प्राणाला मुकल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.
तसेच, वाडग निश्चय होऊन अजून लग्न झालेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.’
“त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की युद्धाच्या भीतीने कोणी गलितगात्र झालेला असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही अवसान गळेल.
“युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.