यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करुन यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. मग त्याला ते म्हणाले, “याबेश गिलादच्या लोकांनी शौलचा दफनविधी केला.”
तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने झुंज द्यायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.
प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच “धारदार सुऱ्यांचे क्षेत्र” असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे.
(असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते.) म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव. एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वत:साठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घुसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला. असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले.
पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. (ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.)
तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्याला विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे पर्यवसान दु:खात होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांना सांग.”
यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांना त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरुन दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्याला आढळून आले.
दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले. यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करुन उजाडता उजाडता हेब्रोन येथे पोचली.