अलीशा म्हणाला, ‘परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो ‘द्या या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.”
तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशा त्याला म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”
शोमरोनमध्ये अन्नाचे दुर्भिक्ष आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ.’
परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांना आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊ करुन आपल्यावर चाल करुन पाठवलेले दिसते.”
शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणे-पिणे केले. तिथले कपडे-लत्ते आणि सोने चांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली.
आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडे पर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाही तर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची वर्दी देऊ.”
मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारुन म्हणाले, “आम्ही अराम्यांच्या छावणीवर गेलो होतो, पण तिथे कुणाचीच चाहूल लागली नाही. एकही माणूस तिथे नव्हता. तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती. माणसांचा मात्र पत्ता नव्हता.”
रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”
यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. गावात माणसे कशीबशी तग धरुन आहेत, तसेच हे घोडे एवीतेवी मरणारच आहेत.”
हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदी पर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाई घाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तूटाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.
तेव्हा लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांना एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.
आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा त्याने जे जे सांगितले त्या बरहुकूमच हे घडले.
पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळं्यादेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.”