परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघाडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.
हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी करद्यापाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.
योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.