परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील.
“तू त्याप्रमाणे वागलास तर तुमच्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी राजासनावर येईल. तुझ्या वडीलांना मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांचीच सत्ता इस्राएलवर राहील असे मी म्हटले होते.
त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूपच मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांतीबली अर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळी. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाशयांबरोबर पाठवले.