येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वत:मध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वत:च्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो, तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे ते आम्हांला मिळालेच आहे.
जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठी त्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्ये पडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्या पापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.
आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वत: त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.
पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे.