याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता.
शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती. यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.
हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.
शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या.