दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा.
मोशेने सांगितले होते त्याप्रमाणे करारकोश खांद्यावरुन आणण्यासाठी लेवींनी विशेष प्रकारच्या काठ्या घेतल्या. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी तो करारकोश आणला.
लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्न, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.
करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.