मग दावीदाने इस्राएलमधील सर्व लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल आणि परमेश्वराचीही ती इच्छा असेल तर इस्राएलच्या सर्व भागात पसरलेल्या आपल्या बांधवांसाठी आपण एक संदेश पाठवू. आपापल्या नगरांत आणि खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांनाही आपण निरोप पाठवू. त्या सर्वांना आपण इकडे यायला सांगू.
मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हामाथच्या प्रवेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांना मग दावीदाने एकत्र केले. किर्याथ यारीमहून हा कोश आणण्यासाठी ते सर्व जमले.
किर्याथ-यारीम म्हणजेच यहूदातील बाला येथे दावीदासह सर्व इस्राएली पोचले. करारकोश म्हणजे करुबांवरती राहणाऱ्या परमेश्वराचा करार कोश. तो आणावा म्हणून ते आले.