Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Kings Chapters

2 Kings 15 Verses

Bible Versions

Books

2 Kings Chapters

2 Kings 15 Verses

1 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला.
2 तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती.
3 अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
4 परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
5 परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
6 अजऱ्याने जे केले ते सर्व ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे.
7 अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.
8 यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते.
9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
10 मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वत: राज्यावर आला.
11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
12 अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.
13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वत: राजा झाला.
15 शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.
16 शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघाडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले.
18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने केली.
19 अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.
20 हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी करद्यापाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
24 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध:पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
25 रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
27 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. पेकहाची कारकीर्द
28 पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यारबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध:पात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.
29 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
30 एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.
31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
32 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते.
33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई.
34 आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला.
36 “यहूदांच्या राजाचा इतिहास’ या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
37 अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.
38 योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.

2-Kings 15:1 English Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×